Monday 12 October 2015

Useful Information on : Butterflies from Papilionidae Family

Butterflies from Papilionidae Family

आज जगभरात जवळजवळ २०,००० प्रकारची फुलपाखरे आहेत ...त्यापैकी भारतात एकूण १,४०० आणि महाराष्ट्रात १७० प्रकारची फुलपाखरे आढळतात . त्यामध्ये फुलपाखरांची जी एक मोठी family आहे , ' Papilionidae ' , यामध्ये मोडणा-या फुलपाखरांना swallowtail butterflies म्हणतात . ज्यामधे Common Rose , Common Mormon , Blue Mormon यासारखी फुलपाखरे येतात .त्यापैकी एक सुंदर फुलपाखरू Common Mormon याची आपण माहिती घेऊया .

फुलपाखरांच आयुष्य हे एकूण ४ अवस्थांच्या जीवनचक्रामधे विभागलं जातं .
१) अंड २) अळी ३) कोष आणि ४) फुलपाखरू .

कॉमन मॉरमॉनची मादी लिंबूवर्गीय झाडं म्हणजे कागदी लिंबू , संत्रं , मोसंबं आणि कढीपत्ता यांसारख्या झाडांच्या पानांवर अंडी घालते . एका पानावर एकच अंडं याप्रमाणे ती एकावेळी साधारण २५ ते ३० अंडी घालते . साधारण ३ ते ५ दिवसांनी त्या अंड्यातून एक छोटीशी अळी बाहेर पडते . त्यावेळी तिचा आकार अर्धा सेंटिमीटर पेक्षाही कमी असतो . जन्मानंतर थोड्याच वेळात ती त्या झाडाची पानं खायला सुरूवात करते .
या अवस्थेत फक्त अधाशासारखी पाने खाणे एवढेच काम तिला असते . या झाडांच्या पानांमधे अळीच्या वाढीसाठी पोषकतत्वे असतात , म्हणूनच अशाच प्रकारच्या झाडांवर फूलपाखरू अंडी घालते . म्हणजे जन्माला आल्या आल्या लगेचच अळीला पोषकतत्वाने भरपूर पाने खायला मिळतात . पानं खात खात अळी मोठी होते . जवळजवळ ४ ,५ सें मी एवढी लांब आणि करंगळीएवढा आकार झाला की त्या अळीचा सुरुवातचा रंग बदलतो . आधी काळपट करड्या रंगाची आणि साधारण पक्ष्याच्या विष्ठेसारखी दिसणारी अळी आता अतिशय आकर्षक गडद पोपटी रंग धारण करते . अशावेळी ती पानावर बसलेली आपल्याला कळत पण नाही . पण पक्ष्यांचं मात्र या अळ्यांकडे बारीक लक्ष असतं . या अळ्या पोषकतत्वाने भरपूर असल्यामुळे पक्षी आपल्या पिल्लांच्या भरणपोषणासाठी अशाच अन्नाच्या शोधात असतात . म्हणूनच तर फुलपाखराने एकावेळी २५ , ३० अंडी घातली असली तरी अळीच्या अवस्थेत असताना त्यांची शिकार होण्याचे प्रमाण फार मोठे आहे . प्रत्यक्षात सगळ्या अवस्था पार करून आकाशात भरारी घेणारी फुलपाखरं २५ पैकी ४, ५ एवढयाच प्रमाणात असतात . असो.
तर अशी पानं खाऊन मोठी झालेली अळी एक दिवस झाडाच्या फांदीवर चिकटून एक कोष तयार करते . तिच्या जन्मापासून साधारणपणे १८ ते २० दिवसांनी असा कोष तयार होतो . आधी अधाशासारखी पानं खाणारी अळी कोषाच्या अवस्थेत गेल्यावर एकदम निद्रिस्तावस्थेत असल्यासारखी फांदीवर चिकटलेली असते . यावेळी ती निद्रिस्तावस्थेत किंवा सुप्तावस्थेत असते असा एक गैरसमज आहे . तसं अजिबात नसतं . उलट याच अवस्थेत तिच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होत असतात . या अळीचं फुलपाखरात रूपांतर होण्याची महत्त्वाची प्रक्रिया याच अवस्थेत तर घडत असते .
कोषाच्या अवस्थेत साधारणपणे १० दिवस राहिल्यानंतर एके दिवशी हा कोष फोडून सुंदरसं फुलपाखरू बाहेर पडतं . सूर्योदयापासून ते सकाळचे ७ , ८ वाजेपर्यंत केव्हातरी हा सोहळा चालू होतो . कोषातून बाहेर पडायला फुलपाखराला अतिशय कष्ट घ्यावे लागतात , खूप धडपड करावी लागते . पूर्णपणे बाहेर पडायला त्याला १५ ते २० मिनिटे लागतात . बाहेर पडल्यावर त्याचे पंख गुंडाळलेल्या अवस्थेत असतात , हळूहळू हालचाल करून त्यांची गुंडाळी ते सोडवतं . असे पंख जरासे ओलसर असतात , याचे कारण म्हणजे कोषावस्थेत असताना कोषाच्चा आत एक प्रकारचा द्रवपदार्थ असतो जो रूपांतरणाच्या काळात त्याचे पोषण करत असतो . असे नुकतेच उलगडलेले पंख छान गडद रंगाचे आणि आकर्षक दिसतात . बाहेर आल्यावर थोडा वेळ ते आहे तिथेच बसून असतं , लगेच उडत नाही . हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जातं . मग शेजारच्या झाडावर जातं आणि मग दूर जातं . कोषातून बाहेर पडून मोकळ्या हवेत भरारी घ्यायला त्याला ४० मिनिटांपासून एक दीड तासाचा कालावधी लागू शकतो .
आपल्याकडे लिंबूवर्गीय काही झाडे असतील , आणि त्यावर फुलपाखरू येऊन बसतंय असं दिसलं , तर आपण नीट निरीक्षण केल्यास फुलपाखराचा हा जन्मसोहळा आपणही अनुभवू शकतो . एक अलौकिक अनुभूती आपणही अनुभवू शकतो .     










BY Anuradha Dushi

No comments:

Post a Comment